जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते तेव्हा सगळ जगच तुमच्या मदतीला ती साध्य करण्यासाठी धावून येतं...!


कॅलिफोर्नियामध्ये येऊन काही दिवस झाले होते..  इथल्या वातावरणाशी , इथल्या लोकनाशी हळू हळू रुळत होते.. एकदा एका शनिवारी सहज काहीतरी लॅपटॉप वर बघताना चेरी ब्लॉसमचे छायाचित्र बघितले..  आणि लक्षात आले कि ही पाचवी खेप अमेरिकेची पण इथे वसंत ऋतू पहिल्यांदाच अनुभवत आहे.. हलक्या गुलाबी रंगाच्या चेरी फुललेल्या बागांचे छायाचित्रांनी मला मोहून टाकले.. लगेचच वॉशिंग्टन डीसीमधील  चेरी बहर उत्सवाच्या तारखा बघितल्या.. अगदी एका आठवड्यानेच तो उत्सव होता.. मग लगेच विमानाचे तिकीट बघायला सुरुवात केली.. मला शनिवार रविवारचा जमणार होते, इतक्या ऐनवेळेसचे तिकीट आणि त्यात ते चेरी बहराचे दिवस.. अतिशय महाग म्हणजे जवळ जवळ दुप्पट किमतीचे तिकीट शिल्लक होते.. पण मला आता तो चेरी बाहेर बघितल्याशिवाय चैन पडणार नाही असे वाटत होते.. त्यामुळे तिकडे संजीव आणि इकडे मी असे वेगवेगळ्या राज्यातून , वेगवगेळ्या मार्गाने जरा बजेट मध्ये तिकीट मिळते का बघत होतो..  कितीतरी वेळ शोध चालू होता... अगदी बस रेल्वेचे पर्याय सुद्धा बघितले.. पण तिकिटाच्या किंमती काहीच्या काही होत्या..एरवी मी इतका विचार करत नाही पैशाचा पण आता इतर खर्चही बरेच चालू आहेत.. त्यामुळे शेवटी मी लॅपटॉप बंद करून टाकला..  नंतर कधीतरी जाऊ असा विचार करून चेरी  प्रकरण मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला.. 

दुसऱ्यादिवशी रविवारी मी माझ्या आवडत्या लागुना येथील समुद्र किनार्यावर फिरायला गेले..  लगुना माझ्या घरापासून गाडीने २०/२५ मिनिट्सवर आहे.. मी बसने जाते, २ बस बदलून साधारण एक तास लागतो.. वेळ जास्त लागला तरी बसने प्रवास करणे सोपे आहे इकडे.. बस एकदम वेळेवर येतात आणि गर्दी अजिबातच नसते..  त्या समुद्र किनाऱ्यावर मी काय माहिती कितीवेळा गेले असेल पण मला दरवेळेस तितकेच आकर्षण वाटते आणि दर वेळेस अजून जास्त मजा येते.. सागर किनाऱ्यावर मनसोक्त भटकून मग संध्याकाळी पुन्हा बसने परतीचा प्रवास सुरु केला.. पहिल्या बस नंतर दुसऱ्या बससाठी अर्धा तास वेळ होता.. मग मी जवळच काही दुकाने होते तिकडे सहज चक्कर मारायला गेले..  थोडा वेळ गेल्यावर पुढच्या बसच्या ५मिनिट्स आधी बस स्टॉपवर यायला निघाले तर चौकात पुढची बस दिसली.. ती वेळेआधीच आली होती आणि मी बस स्टोपवर जाईपर्यंत निघून सुद्धा गेली.. सहसा बस अशी  वेळेआधी कधी निघून जात नाही, पण आज कसे काय झाले असे काय माहिती.. बसला वेळ आहे म्हणून मी वेळ घालवण्यासाठी  जवळच्या दुकानात चक्कर मारली होती  आणि बस मात्र वेळेआधी निघून गेली..  माझा चेहरा रडवेलाच झाला कारण पुढची बस आता एक तासाने होती.. आता उबर करून घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता..

बस कशी काय मला सोडून गेली, मी उगाच दुकानात गेले, बस स्टोपवरच थांबायला हवे होते, पुढच्या वेळेस बस टॉपवर १० मिनिट्स आधी येऊन थांबेन असा विचार करत करत मी चालत पुढे निघाले.. संध्याकाळ होती आणि रस्ता सुंदर होता.. थोडेसे चालून मग पुढे जाऊन उबर करू असे मी ठरवले.. आणि चालता चालता वाटेत काय आश्चर्य मला एक सुंदर गुलाबी रंगाचे झाड दिसले.. त्या फुलांचा सडा जमिनीवर पडला होता.. संध्याकाळच्या प्रकाशात ती फुले फारच सुंदर दिसत होती.. मला ते झाड बघून अतिशय आनंद झाला.. नंतर लक्षात आले कि तिकडे आत गोल्फचे मैदान होते आणि त्याच्या कडेला हे मोहक झाड होते.. खरंच त्या एका झाडाने, त्या गुलाबी रंगाने मी वेडी झाले.. काल मी कितीतरी वेळ चेरी बहर बघण्यासाठी डीसीला जायचे ठरवत होते.. पण तिकीट महाग असल्याने तो हट्ट जबरदस्ती मनातून काढला..  आणि योगायोगाने आज हे झाड अगदी अनपेक्षितपणे माझ्या वाटेत लागले.. !!! अगदी न ठरवता.. फार खुश होते मी त्या संध्याकाळी.. 

या छोट्या घटनेतून मला २ गोष्टी कळल्या.. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अगदी मनापासून पाहिजे असते तेव्हा ती साध्य करण्यासाठी सगळ जगच मदतीला धावून येतं..  मला खरंच वसंत ऋतूचा बहर  बघण्याची फार इच्छा होती आणि काही न ठरवता आज अचानक हे सुरेख चित्र बघायला मिळाले होते..  आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे काही कारण असते.. माझी बस चुकल्याचे दुःख मला बरच वेळ वाटत होते पण बस चुकल्यामुळेच मी चालत निघाले होते आणि चालताना मला अचानक हा गुलाबी रंगाचा आनंद लाभला होता.. बस चुकल्याची तोट्यापेक्षा मला हे झाड बघायला मिळाल्यावर  झालेला  आनंद खूप जास्त होता.. !!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट