अभिमान - गर्व - माज



अमेरिकेत आल्यावर काही दिवसातच मी ऑफिसजवळ असणाऱ्या कॉलनीमध्ये राहायला गेले..  जागा माहितीची होती.. सामान ब्यागेतून काढून हळू हळू लावायचे होते.. तिथे राहायला गेल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवारी, किराणा ,भाज्या आणायला मी निघतच होते तेव्हा अचानक एक उंदराचे पिल्लू आमच्या खोलीत फिरताना दिसले.. मला हे अगदी धक्कादायक होते, मी जोरात किंचाळले.. माझ्या सोबत राहणाऱ्या मुली धावत आल्या.. त्या उंदराला त्यांनी कसे बसे खोली बाहेर काढले.. मग तो उंदीर स्वयंपाक घरात गॅसच्या खाली कुठेतरी जाऊन लपला.. नंतर मग ऑफिस मधून एक माणूस येऊन त्या उंदराला घेऊन गेला..  तेव्हा कळलं कि गॅसच्या पाईपजवळ छोटीशी फॅट होती तिथून हे उंदीर आत येतात.. त्यावेळेस सोबतच्या मुली म्हणाल्या कि १५ दिवसापूर्वीही असा उंदीर आला होता.. झालं मग मी किराणा आणायचा बेत रद्द केला.. ज्या स्वयंपाकघरात उंदरं पाळतात, तिकडे धान्य आणि अन्न कसे ठेवायचे.. मी डबा लावून टाकला, इकडे घरगुती डबा मिळतो हे आमचे भाग्य आहे.. नंतर ती फट बुजवली आणि आम्हाला वाटलं समस्या संपली.. पण काही दिवसांनी परत एक उंदीर दुसऱ्या खोलीत फिरायला लागला.. त्याला बघून आम्ही परत आरडाओरड  केली.. त्याक्षणी आम्ही दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये राहायला जायचे ठरवले.. कसेबसे एकीने त्या उंदराला बाहेर काढले.. पण त्यानंतर कितीतरी रात्री  झोपेत वाटायचे उंदीर आला जवळ तर.. कारण मी खालीच झोपते.. पायाला काही कसला स्पर्श झाला तर उंदीरच असे वाट्तयचे.. आम्ही तिघीही हैराण झालो होतो ते या छोट्या छोट्या उंदरामुळे.. तेव्हा मला दासबोधातल्या ओळी  आठवल्या..

मृत्तिका खाणोन घर केलें| तें माझें ऐसें दृढ कल्पिलें |परी तें बहुतांचें हें कळलें| नाहींच तयासी ||३४||

मुष्यक म्हणती घर आमुचें| पाली म्हणती घर आमुचें |मक्षिका म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३५||
कांतण्या म्हणती घर आमुचें| मुंगळे म्हणती घर आमुचें |मुंग्या म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३६||
विंचू म्हणती आमुचें घर| सर्प म्हणती आमुचें घर |झुरळें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३७||
भ्रमर म्हणती आमुचें घर| भिंगोर्या म्हणती आमुचें घर |आळीका म्हणती आमुचें घर| काष्ठामधें ||३८||
मार्जरें म्हणती आमुचें घर| श्वानें म्हणती आमुचें घर |मुंगसें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३९||
पुंगळ म्हणती आमुचें घर| वाळव्या म्हणती आमुचें घर |पिसुवा म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४०||
ढेकुण म्हणती आमुचें घर| चांचण्या म्हणती आमुचें घर |घुंगर्डी म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४१||
पिसोळे म्हणती आमुचें घर| गांधेले म्हणती आमुचें घर |सोट म्हणती आमुचें घर| आणी गोंवी ||४२||
बहुत किड्यांचा जोजार| किती सांगावा विस्तार |समस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४३||
पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४||
पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५||
तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |आग्न म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६||
समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७||

माणूस जमीन खणून स्वतःसाठी घर बांधतो. "घर माझे आहे" ही कल्पना तो घट्टपणें उराशी बाळगतो.पण ते बहुतांचे आहे, आपलें एकट्याचे नाहीं, ही गोष्ट त्याला कळतच नाहीं.  आपण किती साध्या सध्या गोष्टींचा अभिमान बाळगतो.. पण खरंतर त्या गोष्टी खूप क्षणिक असतात.. क्षणात आपले असते ते नाहीसे होते किंवा परक्याचे होते.. काही कळायच्या आत चित्र पालटते..


इकडे ऑफिस जवळच २०/२५ मिनिट्स ने घर आहे, मी दररोज चालत जाते येते... एक दिवस अचानक पाऊस आला..  एक पूर्वीपासूनची ओळखीची मैत्रीण माझ्याच जवळ बसते, तिने काही महिन्यापूर्वी गाडी घेतली होती  आणि ती माझ्याच कॉलनीमध्ये राहते.. तिला विचारले मी कि तुझ्याबरोबर येऊका आज.. तर ती ठीक आहे म्हणाली.. नंतर अचानक निघाली आणि म्हणाली चल पटकन.. मी कामाबद्दल कोणाशीतरी बोलत होते ते संपवून एक पाच दहा मिनिट्समध्ये तिच्या जागेवर गेले तर ती नव्हतीच.. तिला वोशरूम , पॅन्ट्री सगळीकडे शोधले पण ती नव्हतीच तिकडे.. शेवटी फोने केल्यावर ती म्हणाली कि मी निघाले, तुझ्यासाठी ५मिनिट्स थांबले होते, पण तू आलीच नाही... तिला आधी सांगूनही तीची ती निघून गेली होती.. मला फार वाईट वाटले.. एकतर मी कधीही कोणावर अवलंबून राहत नाही, गाडी आहे म्हणून कोणाच्या गळ्यात पडत नाही.. पण तेव्हा जोरात पाऊस होता म्हणून विचारले.. तर तिने माझ्यासाठी ५/१० मिनिट्स थांबायचे कष्ट घेतले नाही.. असेच काहीसे अनुभव आले गाड्या असणाऱ्या लोकांकडून.. त्यांची गाडी म्हणून ते निघ म्हणले कि आपण निघायचे, आपल्याला जरा काही मिनिट्स उशीर झाला कि ते निघून जाणार.. आपली गरज म्हणून आपल्याला दहावेळा त्यांना आठवण करून द्यावी लागते, मला निघताना सांग अशी.. आणि तरीही हे थांबतीलच  याचा भरवसा नाही..  ते मालक ना.. किती माज..अमेरिकेत सेट झाल्याचा, आलिशान गाडी बंगल्याचा, डॉलर्सचा का अजून कसला काय माहिती.. जराही विचार नाही करायचा दुसर्यांचा..


त्यावेळेस मला वाटले कि माझ्याकडे गाडी असेल आणि कोणी चालत जात असेल तर मी स्वताहून विचारेन.. पण इथेच तर चुकतं माझं.. आपण आणि त्यांच्यामध्ये खूप फरक आहे.. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात हे कळते पण वळत नाही.. त्या काही प्रसंगांनंतर मी ठरवले, आपले उबरला पैसे गेले तरी चालतील पण आपण यापुढे कोणाला राईड मागायची नाही.. पण राहून राहून इतकेच वाटते कि हे आपल्या ऑफिसमधल्या ओळखीच्या लोकांशी असे वागतात तर हे लोक आयुष्यात कधीतरी समाजसेवा करतील का?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट