एकाच या जन्मीं जणू फिरुनी नवी जन्मेन मी.. :)





संध्याकाळ.. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझी सगळ्यात आवडती वेळ..  ऑफिसहुन संध्याकाळी साधारण ५ ते ६ च्या दरम्यान घरी चालत चालत जाते.. तेव्हा उन्ह उतरलेले असते पण सूर्यास्ताला अजून वेळ असतो.. घराच्या  दिशेने चालत जाताना मन एकदमच  निवांत होते.. ऑफिसपासून घरी चालत जायला  साधारण २५ मिनिट्स लागतात.. मी मात्र हळू हळू इकडचे तिकडचे  बघत संध्याकाळचा आनंद घेत रमत गमत जाते.. इकडे ना रहदारी ना कसले आवाज.. रस्ता अतिशय सुंदर आणि स्वच्छ.. दोन्ही बाजूला झाडं , मधून चालण्यासाठी खास रास्ता..   कधी निरभ्र आभाळ  तर कधी ढगाळ वातावरण.. जरा मोकळा परिसर असल्याने किंवा प्रदूषण नसल्याने किंवा अजून काही कारण असेल पण इकडे आकाशाचा निळा रंग फार सुरेख दिसतो.. चालत जाताना मी  कितीतरी वेळा आभाळाकडे, आजूबाजूच्या झाडांकडे  बघत  बघत जाते.. शिवाय सोबतीला सदाहरित गाणी असतात.. तो परिसर आणि ती गाणी मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.. फार सुंदर वेळ असती ती.. तेव्हा  मला कोणाशीही बोलायचे नसते.. आपले आपण एकटीनेच निसर्गाचा अनुभव घेत जावे वाटते..  या खास क्षणी  मी  स्वतःमध्ये रमून जाते, स्वतःशी हितगुज करते  आणि त्यामुळे आत्मपरीक्षण सुद्धा घडते कदाचित.. 

इकडे मिळणारा असा माझा माझा वेळ आता माझ्यासाठी फार महत्वाचा होता असे वाटते.. प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी कधी अवघड  दिवस येतात आणि जातात देखील.. गेले काही महिने आमची वेळ जरा कठीण होती बहुतेक..  खाजगी आणि व्यावसायिक जीवनात काही ना काही कुरबुरी चालू होत्या.. एका वर्षात झालेले २ गर्भपात, त्यामुळे मनावर आणि शरीरावर झालेले परिणाम.. शेवटच्या पायरीपर्यंत पोहचून नाकारला गेलेला संजीवचा व्हिजा.. ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करून देखील लादले गेलेले आरोप आणि त्यासाठी केलेला संघर्ष.. ओळीने एकामागून एक असे चालू होते त्यामुळे मन थोडे नकारात्मक होईल किंवा कदाचित चांगल्या गोष्टींवरचा विश्वास उडेल असे वाटत होते.. अर्थात तेव्हाही मनाचा तोल सांभाळण्यासाठी प्रयत्न चालू होते.. योगाचे एक आठवड्याचे शिबीर, संजीवसोबतची कोकणातली सहल आणि आई बाबांसोबत घेतलेले नर्मदेचे अप्रतिम दर्शन, आणि थोडेफार सामाजिक उपक्रम अशा सगळ्या गोष्टींची खूप मदत होत होती.. माझे घरचे व काही जवळचे सखेसोयरे यांचा आधार होताच.. मुख्य म्हणजे हा सगळा अवघड काळ मी एकटी झेलत नव्हते तर संजीव आणि मी दोघे मिळून सामोरे जात होतो.. तरीपण मी पूर्णपणे बाहेर आले नव्हते हे मलाही जाणवत होते.. जणू काही चकवाच लागला होता.. त्यामुळे मग माझ्या व्हिजाची मुदत वाढवण्याच्या निमित्ताने अमेरिकेला जायचे आणि व्हिजाचे काम कितपत यशस्वी होते ते पाहून मग पुढचे ठरवायचे असे मी आणि संजीवने ठरवले..  संजीवला एकटे सोडून दूर देशी जायचा निर्णय तेव्हढा सोपा नव्हता पण थोडे दिवस असे काढायचे अशी मनाची तयारी केली..

मग एक दिवस गडबडीत अमेरिकेला आले.. परका देश असला तरी जागा माहितीची होती , जणू मी माझ्याच दुसऱ्या गावाला आले.. इकडे  हळू हळू रुळू लागले आणि जरा शांत देखील वाटू लागले.. इथे बराच वेळ मी माझ्यासोबत घालवते.. कधी घराजवळ आसपास चालायला जाते तर  कधी माझ्या आवडत्या समुद्र किनाऱ्याला भेट देते.. सागराशी, लाटांशी, ढगांशी, वाऱ्याशी,  सूर्याशी अन  चंद्राशी आपले आपले हितगुज करते.. निसर्गाच्या कुशीत माझे मन फार मोकळे आणि सकारात्मक होते.. आपल्याला जे जितके काही मिळाले ते किती अमूल्य आहे याची जाणीव होते आणि कृतज्ञता वाटते.. घरच्यांपासून लांब आल्यावर त्यांच्या प्रेमाची आणि आधाराची किंमत प्रकर्षाने जाणवते.. निसर्गाच्या सानिध्यात असे  स्वतःसोबत मनसोक्त फिरले कि मनातला जुना मळ निघून जाऊन नवीन उत्साह येतो.. मन असे प्रसन्न झाले  कि मग वेगळे अजून काय हवे असते?


  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट